Tuesday, November 07, 2006

 

भारतीय घराचे स्फ़ुट..

माणसाच्या मुलभुत गरजांमधे तशा सर्वच गरजा धडपड करुनच प्राप्त होतात. अन्न वस्त्राची बरोबरी करण्या इतपत सक्षम होणार्‍या कित्येकांना घर उभे करण्यासाठी मात्र तपातूनच जावे लागते. उभ्या आयुष्यात कित्येकांचे हे स्वप्न साकार देखील होत नाही. कित्येक घरांची नावे 'स्वप्न - साकार', 'श्रम - साफ़ल्य' ठेवलेली असतात. ती वाचली की वाटते, तसे घर होणे हे बहुतेकांचे एक फ़ार मोठे स्वप्न साकार होण्यासारखे आहे आणि आयुष्यभराच्या श्रमाची साफ़ल्यता त्यात आहे. 'भाड्याचे घर अन् खाली कर' अशी एक म्हण मराठी भाषेत प्रचलित आहे. अशी बेघर होण्याची वेळ येऊ नये म्हणून पै पै जोडून मनुष्य आपले बिर्‍हाड उभारतो. जिथे भाड्याचे घर दोन तीन खोल्यांचे असते तिथे हक्काचे घर म्हणजे एक पसाभर नाहणीची जागा किंवा ह्या उलट जिथे टिचभर खोलीत अर्धाउप्पर संसार पार पडलेला असतो तिथे हक्काचा बंगला तयार होतो. मात्र घर झाल्याचे सुख फ़ार असे वेगळे नसते. घर बदलताना किंवा साधे आठेक दिवस बाहेर जाताना कुटुंबवत्सल स्त्री आधी पणती तेवत ठेवून मगच घराला कुलुप लावते. बालपणी, एखाद दोन वर्ष राहून बदली झाली की सरकारी घर सोडून जाणारे संसारीक जोडपे ज्या जागेनी आपल्याला निवारा दिला तिचे आभार पणती लावून, त्या जागेवर माथे टेकवून मानत असत. घराचे आभार मानण्याची ही पद्धत मनात घर निर्माण करुनच गेली.

ईथल्या Jurong Bird Park मधे एक सोनपिवळा पक्षी आहे. मादी नरासाठी एक सुरेल गाणे म्हणते. ती म्हणते, आधी तू घर बांध मग मी तुझी प्रेयसी होऊन तुझ्याकडे येईन. त्यामुळे नर पक्षी आधी घरटे विणतो मग त्याला मादीप्रेम लाभते. ही अट मनुष्यजातीत असती तर पुरुषांना म्हातारपणच जवळ आले असते आपली राणी मिळवण्यासाठी. अर्थ चित्रपटातील पुजा नावाचे पात्र, शेवटपर्यंत तिला तिचे घर लाभत नाही. जिथे चित्रपट संपतो तिथे तिला तिची योग्य वाट जरी मिळालेली असते पण घर नाही. इजाजत मधील मायाचा, ती घर सोडून गेल्यावरही, घरातील सर्व गोष्टींवरचा तिचा स्पर्श कायम असल्यासारखा घरातील स्त्रीला वाटत राहतो. अखेरीस ते घर अनाथ रिक्त होऊन दोघींचेही होत नाही. इंदिरा संतांच्या एका कवितेत गळणार्‍या घराला, घरातील होती नव्हती भांडी अपुरी पडतात आणि अशा वेळी पावसावरचा कवयित्रीचा लटका राग एक सुंदर पाऊसगीत घेऊनच येतो. इथे झाडांची फ़ुले, फ़ांद्या, पाने तोडायला बंदी आहे. तरीही दिवाळीच्या दिवशी सर्वांसमक्ष मी आंब्याच्या चार डहाळ्या टाचेवर उंच उड्या मारून तोडल्याच. कोण बघत आहे आणि कोण काय म्हणेल मला ह्याची तमा नव्हती. घरी पोचल्यावर एक सुस्कारा टाकला. सुतळी घेतली आणि सर्व दारांना तोरण बांधले. आंब्याची कोवळी कोवळी आणि लांब लांब पाने वार्‍याच्या झुळकेने उडताना त्यांचा मधुर गंध घरात दरवळला आणि क्षणात एक चैत्यन्याची लहर माझ्या देहात पसरली.

जवळच्या परिसरातील चिनी वातावरण बघुन माझे लक्ष मी जेंव्हा घरातल्याच वस्तुंवर वळवतो तेंव्हा हरेक वस्तू रूप - रंग - गंधाला अस्सल भारतीय असावी असे मला मनापासून वाटते. म्हणून घरात, श्रीगणेशाची ज्वालामुखीच्या काळ्याकभिन्न आणि सछिद्र पाषाणूतून घडवलेली एक मुर्ती मी प्रवेशदाराशीच ठेवली आहे. एकदा मुर्तीला वाहीलेल्या फ़ुलापानांचे निर्माल्य गोळा करताना सुपारी, विड्याची पाने, अक्षता, वाळलेली दुर्वा, जास्वंदाचे फ़ुल खूप काही गोळा केले पण ती कोरी करकरीत मुर्ती बघवेना मग ते सर्व निर्माल्य तसेच तिथे राहू दिले. त्यातून केवढा तरी भारतीयपणा प्रकट होतो हे तेंव्हा मला कळले. एकदा वृषालीकडे मी नाटकाच्या तालमिला गेलो. चिनी आणि पाश्चिमात्त्य वस्तुनी मढवलेले ते घर मला बघवेना. इतक्यातच स्वैपाकघरात कांद्याचे शिंकडे मी बघितले आणि चेहर्‍यावर आपलेपणा झळकला. तेंव्हापासून माझ्याही घरात मी कांद्याचे शिंकडे आणण्याचा विचार करतो आहे. तेवढाच घराचा भारतीयपणा वाढेल. कुठल्याशा तरी नाटकाच्या नेपथ्यात सर्व फ़ुलदाण्या फ़ुलांसहीत भारतीय वाटत नव्हत्या. इतक्यात कुठून तरी खरीखुरी झेंडूची फ़ुले मिळाली आणि ती फ़ुले फ़ुलदाणीत ठेवताच सर्व नेपथ्याचा चेहरामोहरा जणू बदलून गेल्यासारखा वाटला.

नाही म्हणता म्हणता मी युरपच्या प्रवासात बर्‍याच वस्तू विकत घेतल्या. त्या वस्तू माझ्या घरात सुशोभित दिसतील अशी त्यावेळी एक भावना होती. पण शेवटी मी त्या सर्व वस्तू घरी अकोल्याला घेऊन गेलो. त्या वस्तू इतक्या नाजूकसाजूक आणि कोमलमुलायम होत्या की त्या भारतात आणताना पावलापरिस मला त्यांची काळजी वाटायची. त्या फ़ुटतील तडकतील तर नाही ना. एकदाचे घरी पोचल्यानंतर एकेक वस्तू मी बाहेर काढली आणि दुसर्‍याच दिवशी एक भले मोठे कपाट तयार करायला टाकले. आज ते कपाट परदेशातील वस्तूंनी खच्चून भरलेले आहे. पण मला मात्र माझे घर भारतीय वस्तूंनी नुसते भरलेलेच नाही तर भारतीयपणाने भारलेले देखील हवे आहे!

Friday, November 03, 2006

 

आईचा जन्मदिवस..

असे म्हणतात प्रत्येक प्रसूती स्त्रीसाठी तिचा एक नविन जन्म असतो. आईला तिचा जन्मदिवस माहिती नाही, शाळेत तर ती गेलीच नाही तेंव्हा दाखलाही नाही. मुलांना वाटतं आईचाही वाढदिवस साजरा व्हावा. ह्यावर एक उपाय म्हणून, जो माझा तोच आईचाही जन्मदिवस म्हणून आम्ही साजरा करतो. जेंव्हा दोघांच्या वयांची बेरीज १०० झाली तेंव्हा काय घडले ते मी इथे व्यक्त केले आहे.

व्याकुळ डोळ्यात साठलेले
काळजीचे आभाळ लपवून
आई मला चंद्र दाखवी
कुशीत तिच्या जोजवताना,

असे कैक चन्द्र उगवले
अन् कैक चंद्र मावळले
सरता सरता आमचे आयुष्य
बेरजेला शंभर झाले,

'जिवेत शरदः शतम्' म्हणताना
आई थोडी गंमत करते
तुझे तीस, माझे सत्तर
शंभर शरद पाहिले म्हणते

शरदाचं गव्हाळ चांदणं
दरसाल पिठासारखं सांडतं
नभात चांदवा तोच असतो
मायलेकांचं फ़क्त वय वाढतं..

 

एक घर आसपास...

जेंव्हा मला आपले एकटे राहणे अपरिहार्य आहे असे वाटले त्यावेळी मी घर बघायला सुरवात केली. होतो त्या घरात अगदी जीव गुदमरुन जात असे. शेवटी धुमसत धुमसत का होईना माझ्या मनानी घर शोधायचेच असा निर्णय घेतला. ह्यापुर्वी कधीच एकटे राहण्याची वेळ माझ्यावर आलेली नव्हती. कधी कुणाशी वाद जरी होत नसले तरी भावबंध जुळतील असेही मला कधी वाटले नाही. तर कधी ह्याच्या अगदी विरुद्ध. पटत जरी नसले तरी त्यांचा माझ्या आसपास असण्याचा केवढा तरी आधार वाटायचा. पण असला आधार तरी काय कामाचा जो मला अधिकाधिक कमकुवत करीन. घरात लहान असल्यामुळे आणि सतत आई नाहीतर बहिणीचा पदर धरून राहण्याची सवय इतकी जडली होती की बाहेरच्या जगात त्यांच्याविणा पाऊल टाकणे खचितच मला खूप कठिण गेले.. खास करून भावनिक दृष्ट्या. माझ्यापेक्षा लहानलहान मुले रात्री बेरात्री शीसूला एकटी जात त्यावेळी मला बाहेरच्या मिट्ट काळोखाची खूप भिती वाटायची. एकदा तर बाजूच्या रिकाम्या क्वार्टर मध्ये खेळता खेळता काळोख भरून आला आणि मला माहितीच पडले नाही. कुणीतरी मग त्या घराची कडी बाहेरून बंद केली आणि माझे घर अगदी लागूनच असतानाही मी जोराची आरोळी ठोकली. आईने ती ऐकली आणि माझ्या कानात फ़ुंकर घालत मला पोटाशी कवटाळले. तिच्या कुशीत शिरताना मला क्षणात सुरक्षितता जाणवली. हे आज आठवले की मला वाटते आपण किती खंबीर झालो आहोत. कित्येक दिनं मास वर्ष आपण एकटेच घालवितो कुणाचा कसलाच आधार नसताना. जेंव्हा मी घर बघायला सुरवात केली त्यावेळी जवळपास सगळी agent मंडळी माझ्या ओळखीची झाली होती. मला नेमके कसले घर हवे होते हे त्यांना कळत नव्हते आणि मलाही आपल्याला नक्की कसे घर हवे आहे ते सांगता येत नव्हते. खरे तर मला घरातले घरपण हवे होते जे नविन घरात नक्कीच नसते. ते विकत घेता येत नाही, ते निर्माण करावे लागते. फ़ोनवर ह्या agents पैकी कुणी माझा आवाज ऐकला की ते लगेच मला ओळखत आणि नाही सध्या तरी घर नाही असे सांगत. मला जेवढीकाही घरे दाखविल्या गेली त्या रिकाम्या घरात शिरताना माझ्या अंगावर सरसरून काटा उभा रहायचा. एकदा नविन घर बघताना वरुन खाली पाल माझ्या डोक्यावर फ़िरत होती. तिला पाहून मी ते घर स्विकारणे वेगळे पण आपण एकदाचे कधी इथून बाहेर पडतो असे वाटले होते. कितीतरी चांगली घरं मी बघितली असतील पण त्या रिकाम्या किंवा चिनी - मलय वस्तुंनी भरलेल्या घरात आपण राहूच शकणार नाही हे मला लगेच उमजायचे. मग हताश मनानी आहे त्या घरात जावून माझ्या बंदीस्त खोलीत विचारमग्न स्थितीत अंग झोकून द्यायचो आणि आपल्याला कधी हवासा आशियाना गवसेल ह्याचा विचार करत बसायचो. शेवटी शेवटी आहेत त्यांच्यासोबत जीव इतका विटला होता.. इतकी उबग आली होती त्यांच्यासमवे राहण्याची की परत एकदा घर की तलाश सुरू केली पण तोच अनुभव. इथल्या काही मराठी मंडळींना विचारपूस करून पाहिली पण त्यांच्याकडे एकतर कुणी paying guest म्हणून ठेवले जात नसे आणि जिथे असे असायचे तिथल्या खोल्या आधीच भरून जात असत. माझ्या मनानी एकदम कच खाल्ली होती. शेवटी एक अगदी अखेरचा प्रयत्न म्हणून माझ्या आॅफ़ीसमधील एक व्यक्ती घर खाली करून लंडनला कामानिमित्त्य जाणार होती. ते भारतीयच होते आणि त्यांचे घर सरकारी असल्यामुळे फ़र्निचरपण त्यांचेच होते. शिवाय असा नियमही होता की आपण आपले घर कुणाला transfer करू शकतो. मी त्यांच्या घरी गेलो आणि त्यांच्या घरातील खास भारतीय वातावरणानी माझे मन लगेच प्रसन्न झाले आणि तिथल्या तिथे मी स्वप्न बघू लागलो.. इथे आपले हे सामान असेल.. तिथे ते असेल.. इथे हे ठेवू अन तिथे ते. एक दिवस विचार करून मी त्यांना होकार दिला. त्यांचे जुनेपुराने फ़र्नीचर विकत घेतले आणि ऐन श्रावण महिना होता म्हणून घरात सत्यनारायणाची पूजा करून गृहप्रवेश केला. ते भारतीय जोडपे काल संध्याकाळी सोडून गेले तर मी लगेच सकाळी तिथे पोचलो. शेजारच्या तमिळ बाईला खूप आश्चर्य वाटले त्याचे. आमची लगेच गट्टी पण जमली. नंतर ह्याच घरात आमचे कविता वाचनाचे कार्यक्रम झाले, मित्रांना house-warming ची पार्टी देऊन झाली. पहिल्याच दिवशी मी अगदी बेड रूमचे दार सताड उघडे ठेवून अंधारात गाढ झोपी गेलो. बेडरूममधेच देवघर ठेवले. आपल्याला रात्री झोप लागेपर्यंत निरांजन तेवत ठेवायचे इतके तेल ओतून माझी पूजा होते. त्या प्रकाशाचा मला कितीतरी आधार वाटतो. एकदा एक मित्र मला म्हणालाही बेडरूममध्ये देवघर नको जेंव्हा एक खोली रिकामी आहे. त्यावेळी त्याला काय समजवून सांगावे म्हणून मी जाऊ दिले. रोज सकाळी उठलो तर सिंक मध्ये मुंग्याची रांग असते. तिथे बोटानी टकटक केले तर पाच मिनिटात त्या आपल्या घरात शिरतात. समोरच्या हिरव्यागार झाडावर कावळ्याचे घरटे आहे. पण ती येतात कधी आणि जातात कधी काहीच पत्ता लागत नाही. क्वचितप्रसंगी कावळीन पिलांना भरवताना दिसते. ऐरवी साळूंक्यांचा कलकलाट असतो. बाकी सगळे काही शांत शांत असते. मध्येच इथे कधी कधी मोकळ्या जागेवर चायनीज नाटके होतात. त्यात भांड्यांची बरीच आदळ - आपट होते. आत्ता नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या योगाच्या गुरजींनी मी कुठे राहतो ह्याची विचारपूस केली त्यावेळी सध्या तरी मी एकटाच राहतो अजून दोनाचे चार हात व्हायचे आहे असे उत्तर दिले. ते म्हणाले एकटे राहणे चांगले असते योग्याला. मी मनात म्हंटले चांगले की वांगले हे माहिती नाही पण प्रेमाचे जर कुणीच सोबतीला नसले तर मग आपलपोटी स्वातंत्र्य बरे. गेल्या रविवारी कधी नव्हे तो एकाचा कामानिमित्य फ़ोन आला.. की घर हवे आहे तीन माहिन्यांसाठी. तेंव्हा मी लगेच नकार दिला. नंतर वाईटही खूप वाटले पण आपले अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातात आणि आपल्यासारख्या मनकवळ्या लोकांनाही नाईलाजास्तव खोटेनाटे बोलावे लागते. असो.. चौदा वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासानंतर मला Home sweet home!!!!! लाभले हे महत्त्वाचे.

 

उमज..

तू कविता पाडलीस तेंव्हा
न राहवून मी ग्रेस खाली ठेवले
आरती प्रभुंना वंदन केले
अन् कविवर्य कुसुमाग्रज आठवले..

यथाशक्ती रसग्रहण करताना
रसस्वादाला दिशा मिळेना
आशयातील तोचतोचपणानी
करवादलेला जीव आवरेना..

समस्त संग्रहांना बिलगून
काळीज कापत आसवे
हनुवटीवरुन ओघळून
सरसर घरंगळत गेली..

ओळीओळीतून उमजत गेले
भावना माझीही तिच ती
होती कविता मात्र दुसरी कुठली..

 

अलिप्तता..

चांदण्यांनी खच्चून भरलेलं आकाश
अन् अढळ धृवाची अलिप्तता...

पावलापावलागणिक माणसांची गर्दी
इथे तिथे.. अगदी चोहीकडे
त्यात एकटेपणानी वेढत जाणारी
एक अनामिक हुरहुरणारी भिती
अन् त्याहूनही पटीने अधिक
कुणाच्या तरी सहवासाची!

लखलखण्याची सर्व मौजमजा
क्षणात सरते.. उरते फ़क्त अलिप्तता.

Thursday, November 02, 2006

 

वसंत..

वसंत सरुन गेल्यावर
तरुची काया पालटते
एक एक पान झडताना
आठवण जुनी मोहरते

आठवणींचं हे झाड
खूप पोक्त झालं आहे
अन् गाणार्‍या पक्ष्याला
इथला वसंत अप्रिय आहे..

तरुतळी जमलेली पाने
पाचोळा होऊन करकरतात
निसटून गेलेल्या वसंताला
डोळे सारखे आसूसतात..

Monday, May 22, 2006

 

मार्ग...

खूप काही उरल आहे
ती वाट मात्र मागे पडली;
पुढची नकोशी आहे
तिच पायाशी कशी आली?

रिक्त ओंजळ कमी पडावी
समोर इतकं वेचायचं आहे;
'ईदम न् मम' चा सुर
आतला मी घोकत आहे

चार पावलं मागे जातात
नवी आठ समोर पडतात
पुढे की मागे करता करता
माझे मार्गच बदलतात..

Tuesday, May 16, 2006

 

वसंत असा आहे...

... ह्या शहरातील वसंत
उदास उदास आहे
बहरुन आहे, डवरुन आहे
गाभ्यात मात्र पोखरुन आहे

कोकीळेचा इथे कळिरव आहे
घनदाट झाडीत सुर आहे
आसमंत चौफ़ेर तल्लीन आहे
निरव क्षणी मात्र खंत आहे

मंगलधुन अशी पहाट आहे
सानगोजिरी दुपार आहे,
तिन्हीसांजेची लाली आहे
ऐन राती डोळ्यात कृष्णमेघ आहे

ह्या शहरातील वसंत
वैशाख वणव्यात तळपत आहे
माझ्यासह जीन जगत आहे
माझा सोबती सहचर झाला आहे..

Sunday, March 05, 2006

 

उन, मन आणि पान...

उन, मन आणि पान...

कोवळ्या उनाचे कवडसे
एक हिरवस पान
आणि अस्वस्थ मन

उनाचे सौम्य किरण
पानाची सळसळ
आणि मनाची तळमळ

उनाचे सोनेरी रूप
पानाचा पिवळा रंग
आणि मनाचे नैराश्य

उनाची वाढती रणरण
पानाची घनदाट छाया
मनी दाटलेला काळोख

उनाचे तप्त किरण
पिवळे पिकलेले पान
जळक्या मनाची चाळणी

अखेरचा मंद प्रकाश
गळून पडलेले पान
मनाची घोर व्यथा

पुन्हा एक नविन कवडसे
पानाचे नवे अंकूर
मनाचे गुदमरत जगणे...

Thursday, December 15, 2005

 

झाडांवरच्या कविता ..

१) विसाव्यासाठी ..

अलिकडे स्वप्न डसत नाही
सय सलत नाही,
जीव जडत नाही
की ऊर भरून येत नाही ..

समोर तटस्थ उभे आहे
पर्णहीन झालेले एक झाड
जे फ़ळत नाही, फ़ुलत नाही
बहरत नाही मी मोहरत नाही

हिरवळीच्या वाटेने जाताना
आपले काहीही नसण्याचे
दुखणे अनावर जागे होते ..

... तेंव्हा खास विसाव्यासाठी
ह्या झाडाची निवड केली आहे ...

२) संवादाला ...

.. पाचूच्या ह्या नवख्या बेटावर
माणसांपेक्षा झाडेच भेटतात
पाहिजे अन् तेंव्हा तिथे ...

बिनकामाचे अन् अव्यवहाराचे
सांगावे आजकाल कुणापुढे?

मुकपणे मग संवाद जमे
झुकून सळसळणार्‍या
ह्या मित्रापुढे ...

This page is powered by Blogger. Isn't yours?